लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नेपाळमध्ये पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला उत्तराखंड येथून पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपीला जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करून जुहू पोलिसांनी त्याला अटक केली.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी सुरत चुफे भूल ऊर्फ संदीप कालूसिंह भूल (३०) याच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी पळून गेला. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने याप्रकरणी समांतर तपास करण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा-मुंबई: आमदार रवींद्र वायकर यांची दोन तासांपासून चौकशी सुरू
तांत्रिक माहितीचे विश्लेषण व पारंपरिक तपास पध्दतीची योग्य सांगड घालून आरोपीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यात आली. त्यावरून कक्ष – ९ च्या तपास पथकाने मुंबई, ठाणे, दिल्ली व उत्तराखंड या ठिकाणी आरोपीचा पाठलाग केला. आरोपी नेपाळमध्ये पलायन करण्याच्या तयारीत असताना त्याला उत्तराखंडमधील एका गावातून ताब्यात घेण्यात आले. कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यास अटक करण्यात आली.