लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकातून, रेल्वेगाड्यांमधून प्रवास करताना अडचणीचे होते. अनेक वेळा तक्रार करूनही फेरीवाले आपले बस्तान हटवत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या फेरीवाला विरोधी पथकाने कायदेशीर कारवाई करून दंड वसुलीला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण १२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून, १८ हजार ५०० रुपयांची दंड वसूल करण्यात आला.

फेरीवाला विरोधी पथकाने १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मुंबई विभागातील बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थ, सामानाची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. या पथकाद्वारे फेरीवाला विरोधी पथकाने पुष्पक, गोरखपूर, गोदान, पवन, गितांजली आणि देवगिरी या एक्स्प्रेसमध्ये तपासणी केली. या पथकाने तिकीट हस्तांतरणाची १२ प्रकरणे शोधून काढून १३ हजार ५१० रुपये दंड वसूल केला. तिकिटांच्या अनधिकृत विक्रीची दोन प्रकरणे शोधून एक हजार ८२० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दोन दलालांना पकडण्यात आले. त्याचबरोबर पथकाने कलम १३७ अंतर्गत १२ फेरीवाल्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याविरोधात न्यायालयीन कारवाईत करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांकडून १८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

आणखी वाचा-मोहित कंबोज यांच्याविरोधातील फसवणुकीचे प्रकरण बंद करण्यास नकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवाशांना फेरीवाल्यांविरोधात तक्रार करणे शक्य

मध्य रेल्वेच्या लोकल, रेल्वेगाडी आणि फलाटावर अनधिकृत फेरीवाला आढळून आल्यास प्रवाशांना त्याची थेट व्हाॅट्स ॲपवर तक्रार करता येणार आहे. त्याचबरोबर तिकीट दलाल, संशयित व्यक्तीची माहितीही प्रवासी देऊ शकतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ९००४४४२७३ हा व्हाॅट्स ॲप क्रमांक जाहीर केला आहे. प्रवाशांनी संशयित व्यक्ती, तिकीट दलाल, फेरीवाल्यांचे छायाचित्र पाठवल्यास रेल्वे सुरक्षा दलाकडून त्याची तातडीने चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.