दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने बंदीयोग्य प्लास्टिकविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये दादरमधील फुलगल्लीतील फुलविक्रेते आणि आसपासच्या परिसरातील फळविक्रेत्यांकडून पालिकेने तब्बल ८५ किलोग्रॅम बंदीयोग्य प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.

विधानसभा निवडणुकीच्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे गेले काही दिवस बंदीयोग्य प्लास्टिकविरोधातील कारवाईत मरगळ आली होती. मात्र मतमोजणी झाल्यानंतर पालिकेने बंदीयोग्य प्लास्टिक बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीनिमित्त दादरमधील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून जातात. फुलबाजारातही ग्राहकांची प्रचंड गर्दी होते. अनेक फुल, फळ आणि भाजी विक्रेते प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांमध्येच ग्राहकांना फुले, फळे आणि भाजी देत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाने दादर रेल्वे स्थानकालगतचा फुलबाजार आणि आसपासच्या परिसरात पालिकेने २३ ऑक्टोबरपासून धाडसत्र सुरू केले होते. या परिसरात २३ ते २५ ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये फेरीवाले, दुकानदारांकडून ८५ किलोग्रॅम प्लास्टिकच्या पातळ पिशव्या जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.