मुंबई : विनापरवाना आणि बनावट सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करून त्यांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या एका कंपनीच्या मुंबई आणि पुण्यातील ठिकाणांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या वेळी सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांचा मालही जप्त केला. मुंबईतील जुहू येथील मे. ग्रूमिंग इन्टरप्राइस प्रा. लि. या कंपनीवर मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. ही कंपनी भिवंडी येथील सौंदर्य प्रसाधन उत्पादकाचे नाव आणि परवाना क्रमांक वापरून जुहू येथे विविध सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करत असल्याचे आढळले. विनापरवाना उत्पादन केलेल्या मालाची मुंबई परिसरातील विविध ‘ब्युटी पार्लर’मध्ये ऑनलाइन विक्री करत असल्याचेही या वेळी निदर्शनास आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीने बनावट शाम्पू, कंडिशनर, बेअर्ड वॉश, हेअर ट्रीटमेंट व विविध केरेटीनयुक्त सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करून ७५० रुपयांपासून ते अगदी २८ हजार रुपयांपर्यंत विक्री केल्याचेही तपासात उघडकीस आले. औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या कायद्याचे उल्लंघन केल्याने विभागाने या कंपन्यांमध्ये सुमारे २२ लाख ७१ हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांचे उत्पादन करण्याकरिता लागणारी उपकरणे, रिकाम्या बाटल्या आदी जप्त केल्या. पाच सौंदर्य प्रसाधनांचे नमुनेही चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  मे. ग्रूमिंग इन्टरप्राइस प्रा. लि. कंपनीच्या पुण्यातील वाकड येथील शाखेतसुद्धा विनापरवाना उत्पादन केल्याची माहिती मिळाल्याने या ठिकाणीही मंगळवारी छापा टाकला. औषध निरीक्षकांनी सुमारे ७ लाख ७३ हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने व त्यांच्या उत्पादन करण्याकरिता लागणारे उपकरण, रिकाम्या बाटल्या जप्त केल्या.  मुंबई आणि पुण्यात केलेल्या कारवाईमध्ये एकूण  २९ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action unlicensed counterfeit cosmetics company food drug administration confiscates ysh
First published on: 27-05-2022 at 00:02 IST