मुंबई : मिठी नदी गाळ कंत्राटातील ६५ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याची सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चार तासांहून अधिक काळ चौकशी केली. डिनोला ईडीने समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. याप्रकरणी ईडीने डिनो मोरियाच्या घरासह इतर १३ आरोपींशी संबंधित अशा एकूण १५ हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात मुंबई व कोची येथील ठिकाणांचा समावेश होता. डिनो मोरिया युवा सेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती मानला जातो.
ईडीने छाप्यांपूर्वी आरोपी व संशयितांनी कथित गैरव्यवहाराच्या कालावधीत संपादित केलेल्या मालमत्ता आणि त्या मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांच्या स्रोताची तपासणी सुरू केली होती. छाप्यांमध्ये जप्त कागदपत्रे व मालमत्तांच्या पडताळणीबाबत आठ जणांना ईडीने समन्स पाठवले होते. त्यात डिनो मोरियाचाही समावेश आहे. ईडीने डिनो मोरियाला गुरूवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार डिनो त्याचा भाऊ सॅन्टिनो याच्यासह गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाला. चौकशीनंतर दुपारी तो ईडी कार्यालयातून बाहेर पडला. त्याला पुन्हा चौकशीला बोलवण्यात येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करीत आहे. याप्रकरणी ईडीने मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यात कोचीतील एका ठिकाणांसह डिनो मोरियाच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश आहे. त्यानंतर डिनो मोरियासह आठ जणांना ईडीने समन्स बजावले होते. याप्रकरणातील आरोपी केतन कदम व डिनो मोरिया यांच्यात २०१९ ते २०२२ या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले होते. याच व्यवहारांच्या आधारे डिनो मोरियाची चौकशी करण्यात येत आहे. कदम व मोरिया यांची २५ वर्षांपासून ओळख आहे. त्यांच्या व्यवहाराबाबत माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी डिनो मोरिया व त्याच्या भावाची चौकशी केली होती. आता ईडीने याच प्रकरणात डिनोची गुरूवारी चौकशी केली.
याप्रकरणी महापालिकेचे सहाय्यक अभियंते प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे (निवृत्त), तसेच ॲक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात जोशी, कदम व पुरोहित मध्यस्थी आहेत. आरोपींनी कट रचून पालिकेचे ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.