मुंबई : कलाकार हा कलाकारच असतो. त्याची राजकीय विचारसरणी ही कधीही कलेच्या मूल्यमापनाआड येऊ नये, असे स्पष्ट मत प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य आणि रंगभूमी आशयदृष्टय़ा अत्यंत समृद्ध आहे. किमान मराठी माणसांमध्ये राहून नाटकाविषयी काही शिकता येते आहे याचेही समाधान वाटते, अशा शब्दांत मराठी रंगभूमी आणि कलाकार यांच्याविषयी वाटणारे प्रेम त्यांनी व्यक्त केले.  ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या सातव्या पर्वाचा दिमाखदार महाअंतिम सोहळा शनिवारी, १७ डिसेंबरला प्रभादेवीच्या रवींद्र नाटयम् मंदिर येथे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात रंगला. या सोहळय़ाला रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. 

परेश रावल यांनी सभागृहात प्रवेश करताच टाळय़ांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. ज्येष्ठ रंगकर्मी अजित भुरे यांनी परेश रावल यांच्याशी संवाद साधला. यावेळी तरुण रंगकर्मीना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, नाटकाशी जोडलेले राहा आणि नाटक सातत्याने करत रहा. नाटक ही कधीही न संपणारी उर्जा आहे. टाळय़ा तुम्हाला नेहमी मिळत राहतील, पण त्यासाठी नाटक करण्यापेक्षा अभिनय केला नाही तर आपण मरून जाऊ, असे वाटेपर्यंत नाटक करत रहा, असा सल्ला त्यांनी दिला. कलाकार म्हणून स्वत:ला घडवण्यासाठी साहित्याचा अभ्यासही महत्वाचा ठरतो, असे सांगतानाच मराठीत तर समृद्ध साहित्य आहे. मराठी साहित्याचा अभ्यास केलात तर नक्कीच तुमच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास पक्का होईल, हे त्यांनी आग्रहपूर्वक नमूद केले.

मराठी रंगभूमी, कलाकार यांचे त्यांनी विशेष कौतूक केले. मराठी रंगकर्मीनी मला कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावले तर मी आवर्जून जातो. ते मला बोलावतात म्हणजे मी कलाकार म्हणून बरे काम केले आहे, अशी माझी भावना असते. मराठी लोकांना रंगभूमीचे एक वरदान आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधील त्यांच्या सहभागाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. आमच्यावेळीही मराठी रंगभूमीवर नेहमी निकोप स्पर्धा होत असे. आम्ही गुजराती रंगकर्मी आवर्जून मराठी नाटके पाहायला जात होतो. गुजराती रंगभूमीवर ९० टक्के नाटके मराठी रंगभूमीवरूनच येतात, असे त्यांनी सांगितले. मराठी रंगभूमीशी जोडून राहिल्यामुळे बरेच काही शिकायला मिळते आणि एक वेगळाच आनंद मिळतो, असेही ते म्हणाले. मराठी रंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे प्रयोग होत असतात. लेखनात मराठी रंगभूमी आघाडीवर आहे. त्यांचा स्वत:चा एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे आणि जोपर्यंत तो आहे, तोपर्यंत रंगभूमीला मरण नाही, अशा शब्दात त्यांनी मराठी प्रेक्षकांचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.