आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्लीतून

मलिक यांच्या जावयांच्या प्रकरणाचाही समावेश

मुंबई : मुंबईत क्रुझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शहारुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक करणारे अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबईचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून अखेर या प्रकरणासह राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही तपास काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणांचा तपास  वरिष्ठ अधिकारी संजय सिंह करणार आहेत.

दरम्यान, या प्रकरणात होणारे आरोप लक्षात घेता मीच स्वत: आपल्याकडून हा तपास काढून घ्यावा,अशी मागणी वरिष्ठांकडे केली होती,असा दावा समीर वानखेडे यांनी केला आहे.

आर्यन खानवरील कारवाईवरून समीर वानखेडे आरोपांच्या भोवऱ्यात सापडले होते.  या कारवाईतील त्रूटींवर बोट ठेवून राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे याना लक्ष्य केले होते. तसेच अटक टाळण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण झाल्याचा आरोपही या प्रकरणातील एनसीबीच्या एका पंचाने केला होता. यानंतर एनसीबीने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन केले होते.  अखेर आर्यन तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना बाजूला करण्यात आले आहे. एनसीबीने मुंबई विभागीय कार्यालयांकडून ६ प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही सर्व प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि त्यात आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत. यात अरमान कोहीली आणि आर्यन खानसह नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. दरम्यान, वानखेडे यांच्याकडून सहा प्रकरणांचा तपास काढून घेण्यात आला असला तरी ते मुंबई एनसीबीचे विभागीय अधिकारी या पदावर कायम राहणार आहेत.  मात्र त्यांना आता नवीन  कारवाईसाठी दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोप-प्रत्योरापांच्या अनुषंगाने मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी आल्या असून याची एकत्रित चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बुधवारी तपास पथक नेमण्यात आले. यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेत एनसीबीचे मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी  मुंबई  उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, नवाब मलिक यांनी वानखेडे यांची बदली झाल्याचे ट्व्टि केले होते. मात्र लगेचच एनसीबीकडून वानखेडे यांची बदली नव्हे तर त्यांच्याकडून तपास काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. खुद्द वानखेडे यांनीही ही बाब स्पष्ट केली.

ही तर सुरूवात 

समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आल्यानंतर ही तर फक्त सुरूवात,आहे, अशी प्रतिक्रिया नवाब मालिक यांनी व्यक्त केली

बदली झाली नाही

माझी बदली झाली नाही. मी अद्याप विभागीय संचालक पदावर कायम आहे. फक्त ६ प्रकरणांचा तपास दिल्लीतील अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यात आर्यन खान व समीर खान प्रकरणांचाही समावेश आहे.’’ -समीर वानखेडे, मुंबई विभागीय संचालक (एनसीबी)