पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी मुंबईच्या वाय. बी. सेंटरमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यामध्ये चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. यावेळी चर्चेमध्ये स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मुकुल रोहतगी, मेधा पाटकर, रिचा चड्डा, तुषार गांधी, विद्या चव्हाण आदी मान्यवरांचा समावेश होता. या चर्चेत ममता बॅनर्जींसमोर बोलताना अभिनेत्री स्वरा भास्करनं देशातील सद्य परिस्थितीविषयी उद्विग्न शब्गांमध्ये तिची भूमिका मांडली.

“करिअर पणाला लावून लढा सुरू”

यावेळी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध इथला प्रत्येकजण आपलं करिअर, रोजगार पणाला लावून लढा देत असल्याचं स्वरा भास्करनं सांगितलं. “मी तुम्हाला खात्री देते की या खोलीतले सर्वजण त्यांच्या पातळीवर लढा देत आहेत. अनेकांनी त्यांचा रोजगार, करिअर पणाला लावून हा लढा त्यांना शक्य तसा सुरू ठेवला आहे. हे सर्वजण चित्रपट सृष्टीमध्ये काम करतात. भारतात काय घडतंय, हे सांगताना या सगळ्यांना मोठा विरोध सहन करावा लागतोय”, असं स्वरा भास्कर म्हणाली.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

यूएपीए आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यांचा ‘प्रसाद’!

देशातलं सरकार आम्हाला यूएपीए आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यांचा प्रसाद वाटतंय, अशा शब्दांत स्वरा भास्करनं आपला संताप व्यक्त केला आहे. “आम्ही अशा परिस्थितीत आहोत, जिथे एकीकडे एक पूर्णपणे बेजबाबदार जमाव आहे. सत्ताधाऱ्यांना अशा जमावाचा आपल्या फायद्यासाठी हवा तसा वापर कसा करायचा हे माहिती आहे. पोलिसांना, सरकारला यावर काहीच आक्षेप नाही. आणि दुसरीकडे, एक सरकार आहे जे अनिर्बंध सत्ता उपभोगत आहे. यूएपीए आणि देशद्रोहाचे गुन्हे एका अशा देवाचा प्रसाद म्हणून ते आम्हाला वाटत आहेत, ज्याची आम्हाला अजिबात भक्ती करायची नाही. आमच्या सर्वांचे रोजगार आज जाण्याची शक्यता आहे”, अशा शब्दांत स्वरानं आपला संताप ममता बॅनर्जींसमोर व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ममता बॅनर्जींनी सांगितला भाजपाच्या पराभवाचा फॉर्म्युला!

देशात भाजपाला पराभूत करायचं असेल, तर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. “जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पराभूत करणं सोपं आहे”, असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी नमूद केलं.