मुंबई : ‘राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजने’तील जागांमध्ये ५० ची भर पडली आहे. तसेच, फाईन आर्टस, फिल्म मेकिंग, अ‍ॅनिमेशन, डिझाईन या कला शाखेतील परदेशी उच्च शिक्षणासाठीच्या निकषांमध्येही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विषयाच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सुधारणा करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वाजित कदम, अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, सह सचिव दिनेश डिंगळे, आयुक्त प्रशांत नारनवरे यांसह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सध्या ७५ असलेल्या या जागा येत्या काळात २०० पर्यंत वाढविण्याचा विचार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.

फाईन आर्ट्स, फिल्म मेकिंग, अ‍ॅनिमेशन, डिझाईन आदी विषयात परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात शिक्षण देणारी महाविद्यालये जागतिक ‘क्यू एस रँकिंग’च्या ३०० रँकमध्ये येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे क्यू एस रँकिंग सोबतच क्यूएस पब्लिकेशनकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या विषयनिहाय रँकिंगचा पर्याय ग्राह््य धरण्यात यावा आणि कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेतून लाभ मिळावा, या अनुषंगाने निकषात बदल करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी दिले. तसेच, योजनेकरिता अर्ज करण्यापासूनची सर्व निवडप्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे.