मुंबई : रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांचीच नियुक्ती होणार, असा ठाम दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते करीत असले तरी येत्या स्वातंत्र्यदिनी रायगडमध्ये महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे. हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गोगावले यांना मोठा धक्का मानला जातो. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर गेल्या जानेवारीमध्ये नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडसाठी आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच अवघ्या २४ तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर दावा केला होता.
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली असली तरी झेंडावंदन तसेच कुंभमेळ्याच्या तयारीच्या बैठका महाजन हेच घेतात. त्यांच्याकडेच नाशिकचे पालकमंत्रीपद कायम राहिल, असे भाजपच्या नेतृत्वाने एकनाथ शिंदे व अजित पवारांना स्पष्टपणे सांगितले आहे.
गोगावले यांना वगळले
स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार याची यादी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली. या यादीत रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणारे भरत गोगावले यांना वगळण्यात आले आहे. गोगावले यांची कोणत्याच जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी नियुक्त करण्यात आलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये ध्वजारोहण होईल. एकनाथ शिंदे (ठाणे), छगन भुजबळ (गोंदिया), राधाकृष्ण विखे-पाटील (अहिल्यानगर), चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर) हे ध्वजारोहण करतील. पालकमंत्र्यांची त्या-त्या जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे.
तटकरे यांना झुकते माप
रायगडचा तिढा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बसून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मागे केली होती. पण शिंदे व अजित पवार दोघेही रायगडवर ठाम असल्याने तिढा सुटू शकलेला नाही. मध्यंतरी रायगड किल्ल्यावर आले असताना केंद्रीय गृमंत्री अमित शहा यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भोजनासाठी भेट दिली होती. यातूनच भाजपचे तटकरे यांना झुकते माप असल्याचे मानले जाते.