निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – Kasba Bypoll Result 2023 : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कसब्यातील परीवर्तन…”

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

यांसदर्भात माध्यमांशी बोलताना, आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. न्यायालयाचा हा निर्णय देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले. तसेच EC म्हणजे एंटायरली काँप्रोमाइज्ड आहे, असं उद्धव ठाकरेंनी यांनी गेल्या आठवड्यातच म्हटलं होतं, त्याची आठवणही त्यांनी करून दिली. तसेच न्यायालयाच्या या निर्णयाचा आयोगाने धनुष्यबाणाबाबत घेतलेल्या निर्णयावर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता, जर तर मध्ये जाण्यात काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Kasba By Poll Result 2023: “निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी करावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच विरोधी पक्षनेते नसतील तर, तेव्हा संसदेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते या समितीचे सदस्य असतील असेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याबरोबरच निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तींबाबत सर्वोच्च न्यायालयाने संसदेला नवीन कायदा बनविण्याचे निर्देश दिले.