Aditya Thackeray : महायुती सरकारला अदाणींची सेवा करायची होती म्हणून तीन वर्षे निवडणूक घेतली नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महायुतीवर त्यांनी कडाडून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

मागच्या महिन्यात मी कुंभारवाड्यात येऊन गेलो. कुंभारवाड्यातल्या घरोघरी मी गेलो होतो. तिथे छोटे-छोटे व्यवसाय सुरु आहेत. आपण घरी ज्या पणत्या लावतो त्या पणत्या, तसंच दहीहंडीला जी हंडी फोडतो ती हंडी कुंभारवाड्यातून येते. आता गणपतीचा सणही येतो आहे. पणती घरोघरी लागणार, नवरात्र येईल, दिवाळीही येई. या सणांचं जे साहित्य असतं ते कुंभारांकडून आपण घेतो. कुंभारवाड्यातले लोक मला प्रश्न विचारत होते की आता आमचं काय होणार होणार? आम्हाला इमारतींमध्ये टाकलं जाईल तेव्हा आमचे व्यवसाय जे पिढ्यांपिढ्या सुरु आहेत त्यांचं काय होणार? आम्ही कुठे जाणार? कुंभारवाडा, कोळीवाडा या ठिकाणी हिंदी, ख्रिस्ती, मराठी बांधव एकमेकांसह आनंदाने राहतात. कोळीवाड्यातही तसंच वातावरण आहेत. काही मुस्लीम बांधव आहेत, हिंदू आहेत. सोमनाथ जिल्ह्यातून आल्याने शंकराचं मंदिरही या ठिकाणी आहे. पण भाजपाने प्रचार सुरु केलाय की हे सगळं रोहिंग्यासाठी काही गोष्टी चालल्या आहेत. तुमच्यात कुणी बांगलादेशी आहेत का? भाजपाला तुम्ही बांगलादेशी कसे वाटता? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी केला.

मेगवाडीतला सर्वे तर धक्कादायक होता

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले मेगवाडीत एक सर्व्हे झाला त्यावर काही लोकांनी विश्वास ठेवला. लोकांना वाटलं आपण अनेक वर्षांपासून इथे राहात आहोत तर काहीतरी चांगलं होईल. आपल्याला चांगली खोली तरी मिळेल. पण जो सर्वे झाला तो जाणून तुम्हाला धक्का बसेल कारण ८० टक्क्यांहून जास्त लोक त्यात अपात्र ठरवण्यात आले आहेत. ते सगळेजण मला सेनाभवन या ठिकाणी भेटायला आले होते. अनेक जण सांगत होते माझे पणजोबा इथे राहायचे, आजोबा राहिले, मी देखील लहानाचा मोठा इथेच झालो तरीही मला अपात्र का ठरवलं गेलं? मी त्यांना विचारलं तुम्ही काय केलंत? ते म्हणाले आम्ही सरकार आणि अदाणींवर विश्वास ठेवला. त्यावर मी त्यांना हेच म्हटलं की ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतो आहे तेच आपला विश्वासघात करतं आहे.

धारावतीत मोठमोठे टॉवर आणले जातील आणि…

आदित्य ठाकरे म्हणाले धरावीत अदाणी समूह आणि सरकार मोठमोठे टॉवर आणतील. हे टॉवर आणल्यावर तुम्हाला काय सांगणार? पियूष गोयल जेव्हा खासदारकीची निवडणूक लढवत होते तेव्हा कोळीवाड्यात प्रचारासाठी गेले. नाकावर रुमाल ठेवला आणि म्हणाले इथे खूप घाण वास येतो आहे हे सगळं इथून काढून टाका. आपल्या मुंबईचं दुर्दैव आहे की कोळीवाड्यांसाठी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला लढा द्यावा लागतो आहे. मुंबई आपली असताना सगळे आपल्याच अंगावर येतात. मागचं फेकनाथ मिंधे यांचं सरकार होतं, त्यांनीही एक हाऊसिंग पॉलिसी काढली होती. त्यावेळी त्यांना फक्त आपण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विरोध दर्शवला असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

अदाणी समूह मुंबईची लूट करतो आहे-आदित्य ठाकरे

धारावीच्या नावाखाली जी काही लूट चालली आहे ती आपण पाहतो आहोत. अदाणी समूह मुंबईची लूट करतो आहे. अत्यंत भयंकर स्थिती आहे. मला माहीत नाही, तुम्हाला हे माहीत आहे का आपलं धारावी जे काही एकरांवर परसलं आहे तिथे पुनर्विकास करायचा आहे. १०० टक्के तो झाला पाहिजे, चांगली घरं, रस्ते मिळाली पाहिजेत पण विकास आपला होतो आहे की अदाणी समूहाचा? हे पण लक्षात घ्या असंही आदित्य ठाकरे म्हणाले.