महाड येथील इमारत दुर्घटनेतून बचावलेल्या मात्र आपलं कुटुंब गमावलेल्या चार वर्षीय मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग या दोन चिमुकल्यांचं पालकत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारलं आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजळपुरा भागात सोमवारी संध्याकाळी पाच मजली रहिवासी इमारत कोसळली होती. यात सुमारे ८० जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या घटनेची माहिती कळताच स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या पथकांनी तातडीने बचाव कार्य सुरु केले. मात्र, या दुर्घटनेत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

दरम्यान, १८ तासांनंतर या इमारतीच्या ढिगाऱ्यातून चार वर्षीय मोहम्मद बांगी या चिमुकल्याला एनडीआरएफच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं होतं. मात्र, या दुर्घटनेत या मुलाच्या आईचा आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला. त्याचबरोबर इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे तो ही यातून बचावला पण त्याचे कुटुंबीय मात्र या भीषण दुर्घटनेतून वाचू शकले नाहीत. त्यामुळे पोरक्या झालेल्या या दोन्ही मुलांचे पालकत्व स्विकारण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला.

दरम्यान, या दोन्ही मुलांचे पालकत्व स्विकारताना त्यांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन उचलणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.