मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षात राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रम व विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अभियांत्रिकी अभ्याक्रमाची निवड यादी ३१ जुलै रोजी, तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नावनोंदणी प्रक्रिया १५ जुलै रोजी पूर्ण झाल्यानंतर २४ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर पुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील २५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर २६ ते २८ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीची निवड यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीमध्ये जागा निश्चित करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी ४ ऑगस्ट रोजी रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे.

दुसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम ५ ते ७ ऑगस्टदरम्यान भरता येणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर होऊन १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी फेरी १६ ते २५ ऑगस्ट आणि चौथी फेरी २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. चार फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थात्मक फेरीसाठी ४ सप्टेंबर रोजी हस्तांतरित करण्यात येतील. त्यानंतर ६ ते १३ सप्टेंबरदरम्यान संस्थात्मक फेरीअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्कासह ११ सप्टेंबरपर्यंत प्रवेश रद्द करण्याची मुभा असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधि अभ्यासक्रमाची निवड फेरी ६ ऑगस्ट रोजी

विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची २४ जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, ३० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १ ते ३ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. तर ६ ऑगस्ट रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ७ ते ९ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालय जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ११ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुसरी फेरी १३ ते २० ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार असून, तिसरी फेरी २१ ते १२ सप्टेंबर आणि संस्थात्मक फेरी १३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.