मुंबई : नीट परीक्षेत समाधानकारक गुण मिळवून, पसंतीक्रम भरलेल्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळूनही केवळ महाविद्यालयाकडून वसतिगृह शुल्कापोटी अव्वाच्या सवा रक्कम आकारल्याने प्रवेश नाकाराव्या लागणाऱ्या गडचिरोलीतील विद्यार्थ्याला चौथ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्याने आपल्याला चौथ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणासमोर (एआरए) केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीचा निकाल लवकरच जाहीर होईल.

गडचिरोलीतील रेपनपल्ली गावातील एका विद्यार्थ्याला नीट परीक्षेत ४२० गुण मिळाले. त्याला सिंधुदुर्गातील नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग प्रसारक एज्युकेशन मंडळ मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या यादीतच अनुसूचित जाती प्रवर्गात प्रवेश मिळाला होता. मात्र त्या वेळी त्याने वसतिगृह आणि भोजनालय यांचे शुल्क न भरता आपली व्यवस्था आपणच करण्याचे कळवल्याने त्याला प्रवेश नाकारल्याचे या विद्यार्थ्याने म्हटले होते. तिसऱ्या फेरीतही हेच महाविद्यालय त्याला मिळाले. त्या वेळी त्याने सीईटी कक्षाकडे तक्रार करणारा ई-मेल पाठवला होता.

मात्र त्यानंतर त्याने तक्रार मागे घेणारा मेल केला. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाकडून आपल्याला डांबून ठेवून महाविद्यालयाने बळजबरी हा ई-मेल पाठवायला लावल्याचे त्याने म्हटले होते. वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी पुढील फेऱ्यांमधून बाद होत असल्याने या विद्यार्थ्याने घडलेल्या प्रसंगाबाबत सीईटी कक्ष, एआरएकडे तक्रार करत योग्य भूमिका घेऊन आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी केली.

विद्यार्थ्याच्या तक्रारीची दखल घेत एआरएमध्ये सोमवारी दृकश्राव्य माध्यमातून सुनावणी घेतली. यावेळी विद्यार्थी व त्याच्या पालकांची प्रथम बाजू ऐकून घेतली, त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना बाजू मांडण्याची संधी दिली. त्यानंतर विद्यार्थ्याच्या प्रश्नांबाबत महाविद्यालयाने उत्तरे दिली. हे सर्व एआरए सदस्यांसमोरच झाल्याने त्यात पारदर्शकता असल्याचे एआरएचे सहसंचालक नीलेश फाळके यांनी सांगितले. तसेच याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, डीएमईआरने या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाचा अहवाल तयार केला होता. त्यात त्यांनी या विद्यार्थ्याला चौथ्या फेरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी शिफारस केली आहे. तसेच एआरएकडूनही या विद्यार्थ्याला चौथ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.