मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या आयुष अभ्यासक्रमाच्या, तसेच फिजिओथेरपी (बीपीटीएच), ऑक्युपेशनल थेरपी (बीओटीएच), ऑडिओ स्पीप लॅग्वेंज (बीएएसएलपी), प्रोस्थेटिक ॲण्ड ऑर्थोटिक (बीपी ॲण्ड ओ) आणि नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स (बीएनवायएस) या निमवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर सीईटी कक्षाने वैद्यकीय, दंत, आयुष व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी २३ ते ३० जुलैदरम्यान नोंदणी प्रक्रिया राबविली होती. मात्र एमसीसीकडून फक्त वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

वैद्यकीय व दंत अभ्यासाक्रमाची पहिली फेरी पार पडल्यानंतर आता एमसीसीने आयुष अभ्यासक्रमांतर्गत असलेल्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, तर निमवैद्यकीय अभ्यासक्रम असलेल्या बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी व ‘बीपी ॲण्ड ओ’ या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पूर्वी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना १ ते ४ सप्टेंबरदरम्यान नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना शुल्क व कागदपत्रे ऑनलाईन भरायचे आहेत. शुल्क भरलेलाच विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहे.

आयुष अभ्यासक्रमाचे वेळापत्रक

बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या तिन्ही अभ्यासक्रमांची अंतरिम यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. ८ ते १० सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. १२ सप्टेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.

प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १३ ते १७ सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान पसंतीक्रम भरता येणार आहे. दुसऱ्या फेरीसाठीची निवड यादी ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

निमवैद्यकीय अभ्यासक्रमाचे वेळापत्रक

बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी व ‘बीपी ॲण्ड ओ’ या अभ्यासक्रमांची अंतरिम यादी ९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी जागांचा तपशील जाहीर करण्यात येणार आहे. १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरता येणार आहे. १६ सप्टेंबर रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १७ ते २१ सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

दुसऱ्या फेरीसाठी जागांचा तपशील १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या फेरीसाठी विद्यार्थ्यांना २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान पसंतीक्रम भरता येणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी दुसऱ्या फेरीसाठीची निवड यादी जाहीर होणार आहे. या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.