मुंबई: कृषी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेसाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यामध्ये सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठातंर्गत शिकविण्यात येणाऱ्या कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ शाखांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सध्या सुरू आहे. या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यासाठी १९ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील विविध भागांत सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधारांमुळे ठिकठिकाणी पाणी साचले, वाहतूक ठप्प झाली, वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सीईटी कक्षाने कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कृषी अभ्यासक्रमासाठी ७ हजार ७९६ जागा

राज्यातील चार विद्यापीठांतर्गत असलेल्या १९८ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ७९६ जागा आहेत. यामध्ये ४७ शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६२६ जागा तर १५१ खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार १७० इतक्या जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा या बीएस्सी कृषी या अभ्यासक्रमासाठी १२ हजार २३८ इतक्या आहेत. त्याखालोखाल अन्न तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी १ हजार ४४०, उद्यान विद्या अभ्यासक्रमासाठी १ हजार १३२, जैव तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी १ हजार ४०, कृषी व्यवसाय व्यवस्थापन या अभ्यासक्रमासाठी ९००, कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ८६४, वनशास्त्रासाठी ८२, सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी ६० आणि मत्स्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी ४० जागा आहेत.