डॉ. पद्मा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा नियंत्रक पदासाठी जाहिरात दिली आहे. मात्र आपण राजीनामा दिलेला नाही, असा दावा स्वत: देशमुख यांनी केला आहे.
पेपरफुटी, उत्तरपत्रिका तपासातील दिरंगाई आदी प्रकारांमुळे परीक्षा विभाग सातत्याने चर्चेत असतो. डॉ. देशमुख यांनी राजीनामा दिला असे विद्यापीठ सांगत असले तरी खुद्द देशमुख यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
डॉ. देशमुख यांनी राजीनामा दिला असून त्यांना सीएचएम या त्यांच्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य पदाचे काम पाहण्यासाठी व्यवस्थापनाने सांगितल्याचे कारण त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात दिल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून नवीन परीक्षा नियंत्रकांची नेमणूक होईपर्यंत त्या या पदावर काम करतील, असेही खान म्हणाले.
या पदासाठी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहिरात देण्यात आली असून ती वृत्तपत्रातही प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांना १० फेब्रुवारीपर्यंत आपले अर्ज सादर करावेत असेही खान म्हणाले.