मुंबई : बेस्ट प्रशासनाने बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ केल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली. त्याच वेळी उत्पन्न मात्र एक कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यामुळे बेस्टचे नक्की किती प्रवासी घटले याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
बेस्ट उपक्रमाने बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून वाढ केली. सर्वसाधारण बसचे किमान भाडे ५ रुपयांवरून १० रुपये, तर वातानुकुलित बसचे किमान भाडे ६ रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले. त्याचबरोबर मुंबईच्या हद्दीबाहेर जाणाऱ्या बस प्रवाशांना वाढलेले बसभाडे आणि त्यावर अधिक २ रुपये भरावे लागणार आहेत. एकदम दुपटीने भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांमध्ये पहिल्याच दिवशी नाराजीचे वातावरण होते.
शेअर टॅक्सीला प्रोत्साहन देण्यासाठीच हे भाडे वाढवण्यात आल्याचाही आरोप प्रवासी करीत आहेत. समाजमाध्यमांवरही हा आरोप केला जात आहे. काही ठिकाणी जिथे शेअर टॅक्सी १५ रुपये आकारते, तिथे बेस्टचे भाडे १२ रुपये झाले आहे. मात्र आतापर्यंत बसगाडीसाठी थांबणारे प्रवासी यापुढे शेअर टॅक्सीचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. तसेच एक दोन किमीच्या प्रवासासाठी १२ रुपये देणे महाग वाटत असल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशी बेस्टचे प्रवासी घटलेले असले तरी त्यावरून आताच निष्कर्ष काढता येणार नाही, असे मत बेस्टच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे बस, मेट्रो, रेल्वे सगळ्याच ठिकाणी प्रवासी घटलेले आहेत. त्यातच शुक्रवारी आठवडाअखेर असल्यामुळे बेस्टचे प्रवासी कमी असतात. तसेच युद्धसदृश परिस्थिती असल्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे प्रवासी घटलेले दिसत असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भाडेवाढीमुळे प्रवासी घटले का हे जून महिन्यात समजू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शुक्रवार, ९ मे रोजी रात्रीपर्यंत एका दिवसात २३ लाख १६ हजार प्रवाशांनी बेस्टच्या बसमधून प्रवास केला. तर तिकिट विक्रीतून बेस्टला एका दिवसात २.९३ कोटी रुपये महसूल मिळाला. मात्र गुरुवारी ८ मे रोजी बेस्टच्या बसमधून २५ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. बेस्टची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या ३१ लाख इतकी आहेत. तर दैनंदिन उत्पन्न सरासरी पावणेदोन कोटी रुपये आहे. त्यामुळे भाडेवाढ दुप्पट करण्यात आली असली तरी महसूल मात्र दुपटीने वाढलेला नाही.
आकडेवारी
बेस्टचे दैनंदिन प्रवासी ३१.५ लाख
दैनंदिन उत्पन्न – १.७५ करोड
मासिक उत्पन्न ५० ते ६० कोटी
प्रवासी उत्पन्न वार्षिक – ६८० कोटी
बेस्टकडे सध्या बसगाड्यांची संख्या – २७८४
स्वमालकीच्या बसगाड्या- ६६५