ग्राहकाशी जवळून संपर्क येत असल्याने व्यवसायाबद्दल अनिश्चितता
सुहास जोशी, लोकसत्ता
मुंबई : केशकर्तनालयामध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांचा सर्वात जवळून संपर्क होत असल्याने टाळेबंदीनंतरदेखील लगेच हा व्यवसाय सुरू करावा की नाही याबाबत व्यावसायिकांमध्ये साशंकता आणि धास्ती दिसून येते. सुरक्षेच्या कारणास्तव टाळेबंदीनंतरदेखील केशकर्तनालये अधिक काळ बंद ठेवावी लागली किंवा ग्राहकांचे प्रमाण नियंत्रित करावे लागले तर या व्यवसायाला टाळेबंदीनंतरही ५० टक्कय़ांपर्यंत फटका बसून शकतो, अशी भीती राज्य नाभिक संघटना आणि व्यावसायिक व्यक्त करतात.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ या राज्यस्तरीय संघटनेत सुमारे पाच लाख व्यावसायिक आहेत. यामध्ये शहरी भागातील काही मोजके व्यावसायिक सोडल्यास इतरांसाठी हा रोजच्या कमाईचाच आधार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेषत: ग्रामीण भागातून शहरी भागात गेलेल्या कारागिरांसाठी शिधापत्रिकासारख्या मूलभूत बाबीदेखील नाहीत. त्यामुळे या कारागिरांची सध्या खूपच परवड होत असल्याचे राज्य संघटनेचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी सांगितले.
मुंबई आणि महानगर परिसरात साखळी दुकाने असणारे एक्सपिरिअन्स हेअर अॅण्ड ब्युटी सलूनचे संचालक संदीप राऊत सांगतात की, सध्या सलून बंद ठेवून होणाऱ्या नुकसानापेक्षा येणाऱ्या काळात त्रास अधिक वाढणार आहे. त्या वेळी सलूनमध्ये येणारा ग्राहक कोठून आला, त्याच्या परिसरात काही धोका आहे/होता का, की नाही याची माहिती के शकर्तनालय व्यावसायिकांना मिळणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नवीन रुग्ण आढळणे पूर्णत: बंद झाल्यावरच सलून सुरू करावे, असा अनेकांचा विचार असल्याचे राऊत म्हणाले.
दुसरीकडे सर्वच सलून बंद असल्यामुळे ओळखीच्या ग्राहकांकडून सातत्याने फोनवर विचारणा होत असल्याचे गोरेगाव येथील रिलॅक्स सलूनचे मालक ईर्शाद सलमानी यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत केस कापणे, दाढी वगैरे कामे करणे आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे ग्राहकांना समजावून सांगण्याचे रोजचेच काम झाल्याचे ईर्शाद म्हणाले. टाळेबंदीनंतर ग्राहकांचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागण्याची शक्यता असून कदाचित ५० टक्केच व्यवसाय होईल, असे ते सांगतात.
मुंबई आणि उपनगरातील चार-पाच ग्राहकांसाठी सुविधा असणाऱ्या सलूनचा महिन्याचा खर्च सुमारे ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत असतो. छोटय़ा व्यावसायिकांना हा खर्च झेलणे कठीण असल्याचे चेंबूर येथील स्टायलिश मेन्स पार्लरचे आलम सलमानी यांनी सांगितले. या काळात कर्मचाऱ्यांना सांभाळणेदेखील गरजेचे असल्याचे ते नमूद करतात. सलूनसारख्या ठिकाणी ग्राहक बांधलेला असतो, त्यामुळे टाळेबंदीनंतर व्यवसाय सुरू झाल्यावर ग्राहकांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे राहील, अशी आशा आलम यांना वाटते.
घरच्या घरी प्रयोग
तीन आठवडय़ांहून अधिक काळ सुरू असलेल्या सलूनबंदीमुळे अनेकांची अस्वस्थता इतकी वाढली की, घरच्या घरीच केस कापण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्यासाठी ट्रिमर, कात्री असा साहित्य वापर होत आहे. काहींनी तर ट्रिमरच्या साहाय्याने चक्क गोटाच केला आहे. समाजमाध्यमांवर अशा छायाचित्रांच्या पोस्ट हमखास दिसतात, तर दुसरीकडे काही केशकर्तनालय चालक मागल्या दाराने ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तर काही ठिकाणी चक्क केशकर्तनालय कर्मचाऱ्यास घरीच बोलावून केस कापून घेतल्याची उदाहरणेदेखील दिसतात.