मुंबई : कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २७ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर या अभ्यासक्रमाच्या नऊ विषयासाठी राज्यभरातून २२ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृषी अभ्यासक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी अॅाग्रीकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्ट्री), बी.एफ.एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक (अॅमग्रीकल्चर इंजिनियरिंग), बी.एस्सी कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या कृषी अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या नऊ शाखांसाठी २७ जुलैपर्यंत २७ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील २२ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केला आहे.

कृषी अभ्यासक्रमासाठी राज्यामध्ये १९८ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ७९६ जागा आहेत. त्यात ४७ शासकीय महाविद्यालये असून ३ हजार ६२६ जागा तर १५१ विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये १४ हजार १७० जागा आहेत. कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतरिम यादी ३१ जुलै रोजी जाहीर होणार असून अंतिम गुणवत्ता यादी ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवेशासाठी किमान अट शिथील केल्याचा ५३ विद्यार्थ्यांना लाभ

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीला विज्ञान शाखेतून ५० टक्के गुण असलेली अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्याला बारावीला ४५ टक्के गुण मिळाले आहेत त्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. याचा लाभ फक्त ५३ विद्यार्थ्यांना झाला आहे. मात्र हा नियम फार उशीरा लागू करण्यात आल्याने त्याचा लाभ कमी विद्यार्थ्यांनी घेतला असला तरी पुढील वर्षी या नियमामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.