मुंबई : एका महिलेने विमानात प्रवास करतान सहप्रवाशाला मराठीत बोलण्याची सक्ती केल्याने वाद निर्माण झाला. एअर इंडियाच्या कोलकाता – मुंबई विमान प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. समाजमाध्यमावर या वादाची चित्रफित व्हायरल झाल्याने या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

एक प्रख्यात युट्यूबर २३ ऑक्टोबर रोजी एअर इंडियाच्या विमानाने कोलकावरून मुंबईला येत होता. तो इंग्रजीत बोलत होता. त्यावेळी मागे बसलेल्या एका महिला प्रवाशाने त्याला मराठीत बोलण्याची सूचना केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला.

‘मला मराठी येत नाही, मी मुंबईत जात असलो तरी मराठी का बोलू ? असा सवाल त्याने केला. त्यावर महिला अधिकच भडकली. तू मुंबईला उतर मग तुला दाखवते अशी धमकी या महिलेने दिली. युट्यूबरने याबाबत विमानातील कर्मचाऱ्यांना माहिती देऊन महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली.

हा घटनेची चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या महिलेची ओळख पटलेली नाही. अशा प्रकारे मराठीची सक्ती केल्यामुळे महिलेवर समाजमाध्यमावर टीका करण्यात येत आहे.