एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडखोरीतून धडा घेत अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करताना मोठी खेळी केल्याचं उघड झालं आहे. अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याच्या दोन दिवस आधीच निवडणूक आयोगाला एक ईमेल पाठवत केवळ पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरच नाही, तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि पक्षचिन्ह यावर दावा करत केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेल पाठवला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अजित पवार गटाच्या अर्जावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचीही माहिती जयंत पाटलांनी आयोगाला दिली.

बंडाआधीच दोन दिवस अजित पवारांची मोठी खेळी

निवडणूक आयोगाला अजित पवारांकडून ३० जूनला याबाबत ईमेल मिळाला. याचा अर्थ राष्ट्रवादीत बंडखोरी करून शिंदे-फडणवीस सरकारचा भाग होण्याच्या दोन दिवस आधीच अजित पवारांनी या सर्व खेळी केल्या. यात त्यांनी ४० आमदार व खासदारांची प्रतिज्ञापत्रही सादर केली. तसेच आपल्याला पक्षाने एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्याचंही नमूद केलं.

हेही वाचा : VIDEO: “अरे पण गुगली टाकून आपल्याच गड्याला आऊट करायचं का?”; छगन भुजबळांचा थेट शरद पवारांनाच प्रश्न, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक आयोगात नेमका काय दावा?

अजित पवार गटाने ३० जून २०२३ रोजी मंजूर केलेला ठराव निवडणूक आयोगात सादर केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं. यानुसार राष्ट्रवादीच्या विधीमंडळातील सदस्य आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी बहुमताने अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. प्रफुल पटेल यांचं कार्यकारी अध्यक्षपद तसंच ठेवण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी बहुमताने अजित पवारांना विधीमंडळ नेता म्हणूनही निवडल्याचा दावा करण्यात आला आहे.