scorecardresearch

VIDEO: शीतल म्हात्रेंच्या व्हायरल आक्षेपार्ह व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यामागे…”

शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar on Sheetal Mhatre Video 2
शीतल म्हात्रे व अजित पवार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आणि आरोपींना अटकही झाली. मात्र, त्याचे पडसाद थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडले. आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (१३ मार्च) सभागृहात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “राजकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण लोक आमच्याकडे ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. त्याबद्दल मला खोलात जायचं नाही.”

“‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे”

“कुठल्याही लोकप्रतिनिधीने काही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहि,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

व्हिडीओ पाहा :

दरम्यान, अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना यामिनी जाधव म्हणाल्या, “शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओची सखोल चौकशी करावी. त्या माझ्या सहकारी आणि नगरसेविका होत्या. राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं.”

“या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल”

“यावर कधी कारवाई होणार? या मॉर्फिंगमुळे तिचं आयुष्य बरबाद होईल. ती विवाहीत महिला आहे. ज्याने हे केलं त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत,” अशी मागणी यामिनी जाधव यांनी केली.

“आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल”

आमदार मनिषा चौधरींनीही हा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कारवाईची मागणी केली. मनिषा चौधरी म्हणाल्या, “एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही अतिशय निंदनीय बाब आहे. हा व्हिडीओ पहिल्यांदा कुणी मॉर्फ केला त्याला शोधून काढावं.”

“उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते”

“आज हा प्रकार आज एका आमदार आणि पहिलेबरोबर झाला, उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. कारण कुठलाही माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो ते आम्ही व्हिडीओत बघितलं. त्या उद्घाटनाला मीही उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते,” असं मनिषा चौधरी यांनी सांगितलं.

हेही वाचा : शीतल म्हात्रेंच्या आक्षेपार्ह व्हिडीओवर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मिरवणुकीत असं कोणतंही कृत्य…”

“एखादा डोकेफिरू नवरा असेल, तर त्या महिलेचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. एखादा पुरुष आमदार असेल, तर त्या महिलेचं डोकं फिरून तीही त्या पुरुषाला आपल्या संसारातून बाहेर काढू शकते,” असंही चौधरी यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:12 IST