राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. त्यांना आधी ईडी प्रकरणात आणि नंतर सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. अखेर आज (२८ डिसेंबर) अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिल देशमुख यांची तुरुंगातून सुटका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सहकारी अनिल देशमुख मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. आज ते बाहेर आले आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झाला आहे. हे प्रकरण नेमकं कसं घडलं? याचं सत्य आता लोकांसमोर येईल, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- अनिल देशमुख १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर, समर्थकांचा जल्लोष

यावेळी अजित पवार म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं? हे आता सर्वांसमोर येईल. आज आम्ही खूप खूश आहोत. आज आम्ही अनिल देशमुखांचं स्वागत केलं. एक बैठक घेतल्यानंतर आम्ही अधिवेशनासाठी जाणार आहोत. न्यायव्यवस्थेबाबत आम्ही जास्त काही बोलू शकत नाही. न्यायव्यवस्था जो निर्णय देते, तो सर्वांना मान्य करावा लागतो. त्याचं पालन करावं लागतं. पण आमचे एक सहकारी अनेक दिवसांपासून तुरुंगात होते. न्यायालयाने या प्रकरणात नेमका काय निर्णय दिला, हे आता सगळेजण पाहतील. हे सगळं नेमकं कसं घडलं? याचं सत्यही आता जनतेसमोर येईल,” अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

आणखी वाचा – Anil Deshmukh Bail : ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यावर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “परमबीर सिंह यांनी…”

अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?

अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar first reaction on anil deshmukh released from jail rmm
First published on: 28-12-2022 at 17:19 IST