ठाणे : भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीत बंडाचे वारे वाहू लागले आहे. मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने जागा जाहीर केल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरेश म्हात्रे यांना कोणतीही मदत करायची नाही, अशी भूमिका घेतली आहे. तसेच मैत्रीपूर्ण लढत लढण्याची टावरे यांच्यासह पदाधिकारी ठाम असल्याने मविआ नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदारसंघाचा समावेश आहे. आगरी, कुणबी, आदिवासी अशा मतदारांचा भारणा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला होता तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने या जागेसाठी आग्रह धरला होता. तसेच ही जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर राजीनामा देऊ असा इशारा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिला होता. यामुळे या जागेचा तिढा वाढला होता.
हेही वाचा – नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ही जागा मिळवून बाजी मारली. या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर भिवंडी मतदारसंघात महाविकास आघडीत वादाची ठिणगी पडली. परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला गेल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसमधील इच्छुकांनी बंडाची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी असहकारची भूमिका घेऊन सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीत कोणतीही मदत करायची नाही, अशी उघड भूमिका घेतली आहे. त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला असून त्यासाठी आग्रह धरला आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसतानाही, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारणा केल्यावर ही बाब आम्हाला समजली. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची काहीच ताकद नसून येथे काँग्रेसच्या मतदारांची संख्या मोठी आहे. येथे काँग्रेसचा उमेदवार जिंकेल. म्हात्रे हा भाजपचाच माणूस आहे. प्रत्येक निवडणुकीत ते असेच करतात आणि उमेदवारी मिळवून दुसऱ्याला पडतात. त्यामुळे त्यांचे काम करणार नाही. मैत्रीपूर्ण लढत झाली नाही तर घरी बसू किंवा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर त्यांचे काम करू, असे काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी सांगितले.