धनंजय मुंडे यांचा आमदारकीचा राजीनामा म्हणजे ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केला. शिवसेना व मनसे यांना एकत्र आणण्यासाठी मुंडे करीत असलेले प्रयत्न सकारात्मक भूमिकेतून होते. पण अजित पवारांनी वाईट हेतूंनी घर फोडण्यासाठी हे कारस्थान केल्याने धनंजय मुंडे आता परतणार नाहीत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. त्यावेळी त्यांना अडचणीत आणण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची खेळी अजित पवार यांनी खेळली. पण ते अशा राजकीय खेळ्या करून मुंडेंना पराभूत करू शकणार नाहीत. भाजप गोपीनाथ मुंडे यांच्या पाठिशी असून त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात पक्ष निवडणुका लढवील, असे फडणवीस म्हणाले.
मुंडे हे शिवसेना-मनसेला एकत्र आणण्याबरोबरच पक्षापासून दूर गेलेल्यांना किंवा छोटे पक्ष, अपक्ष नेत्यांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांना आपल्या पुतण्याशी संबंध प्रस्थापित करून त्याचे मन वळवणियात अपयश का आले, असे विचारता मुंडे यांचे प्रयत्न सकारात्मक पध्दतीचे होते. अजित पवार यांचा दृष्टीकोन वाईट आहे. पण ‘बाप हा बापच असतो. गोपीनाथ मुंडे हे राजकारणात बापच आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंविरोधात किंवा लोकसभेसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उमेदवारी दिल्यास भाजपची भूमिका काय, असे विचारता धनंजय मुंडे यांना ‘दोन्ही निवडणुकांसाठी शुभेच्छा,’ असे उत्तर फडणवीस यांनी दिले. मुंडेंना एका विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघात अडकवण्यिासाठी पवारांनी ही खेळी असेल, तरी ती यशस्वी होणार नाही. त्यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात असून मुंडे राज्य व देशपातळीवर प्रचार करतील, असे फडणवीस यांनी सांगितले.