साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा अक्षय्य तृतीयेला आज, शुक्रवारी सोनेखरेदीसाठी ग्राहकांचा उत्साह दिसेल, असा होरा मांडण्यात आला आहे.  अक्षय्य तृतीया हा सोनेखरेदीसाठी धनत्रयोदशीनंतरचा महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या निश्चलनीकरणानंतरचाही सोनेखरेदीचा हा पहिला मुहूर्त आहे. तोळ्यासाठी ३० हजार रुपयांच्या खाली असलेल्या सोन्याच्या दरामुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्त खरेदीला अधिक उत्साह असल्याचे जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी १० ग्रॅमसाठी ३० हजारानजीक वाटचाल करणारे सोन्याचे दर अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला २९ हजार रुपयांच्या आत स्थिरावले आहेत. सोनेदर तोळ्यामागे आता २८,८०० रुपयांच्या आसपास आहेत, तर किलोसाठी ४२ हजार रुपयांचा पल्ला गाठणाऱ्या चांदीचे दरही आता ४१ हजार रुपयांच्या आत स्थिरावले आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मौल्यवान धातू विक्री ३० टक्के अधिक असेल, असा अंदाज अनमोल ज्वेलर्सचे संस्थापक इशु दातवानी यांनी व्यक्त केला. तर यंदाच्या मुहूर्तखरेदीला ग्राहकांची विचारणा तसेच मागणी १० ते १५ टक्क्यांनी वाढेल, असा होरा व्हीएचपी ज्वेलर्सचे संचालक आदित्य पेठे यांनी मांडला. जोडीला सोने तसेच चांदीच्या दागिने खरेदीसाठी यंदाच्या अक्षय्य तृतीयेला असलेली कंपन्यांची, सराफ पेढय़ांची सूट ही घसघशीत आहे. दागिने घडणावळीवर थेट ५० टक्क्यांपर्यंत तर प्रत्यक्ष धातू खरेदीवर तब्बल ३० टक्क्यांपर्यंत सवलत अनेकांनी देऊ केली आहे.