लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाल्याचा, तसेच तो कीर्तिकर यांच्यासोबत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. प्रचारयात्रेत कीर्तिकर यांच्या जवळ इक्बाल मुसा असल्याची छायाचित्रे आणि चित्रफित भाजपचे आमदार अमित साटम यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. त्यामुळे वायव्य मुंबईत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, कीर्तिकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

महाविकास आघाडीने शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांना वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर भाजप शिवसेना महायुतीने शिंदे शिवसेनेचे रवींद्र वायकर उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात कीर्तिकर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोप इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान बुधवारी कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत दिसला, असा आरोप भाजपचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचे समर्थन घेताना दिसत असल्याचा आरोप साटम यांनी केला आहे.

आणखी वाचा- शिवाजी पार्क मैदानातील सभेसाठी मनसेला परवानगी, १७ मे रोजी भाजप आणि महायुतीचा मेळावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ठाकरे गटाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हा आरोप खोडसाळपणाचा आहे. प्रचारयात्रेमध्ये चारशे – पाचशे लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख करून देतात. त्यातील सगळ्यांना उमेदवार व्यक्तीश: ओळखत नसतात. जर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा असा सवाल ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांनी केला आहे.