स्वीय सचिवांची कारवाई रद्द करण्यासाठी याचिका

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे यांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशमुखांवरील आरोप चुकीचे असून ‘ईडी’ची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. एवढेच नव्हे, तर देशमुखांविरोधात खोटे पुरावे तयार करण्यासाठीच आपल्यालाही या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा पालांडे यांनी याचिकेत के ला आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्यांमध्ये देशमुख यांची भूमिका होती हा आरोप चुकीचा आहे. किंबहुना नियुक्त्या-बदल्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण असते आणि मुख्यमंत्री पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार या बदल्या-नियुक्त्या करत असतात, असा दावाही पालांडे यांनी के ला आहे.

त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने ‘ईडी’ला उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने दिले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पातळीवरील पालांडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.