युरोपमधील भारतीयांच्या जिभेवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या कोकणातील हापूस आंब्यासाठी यंदा ‘नो एन्ट्री’चा फलक युरोपच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आला आहे. इतकी वर्षे कोणतीही प्रक्रिया न करता बिनदिक्कतपणे युरोपमधील फळ खवय्यांची हौस भागवणाऱ्या फळांच्या या राजाला तीन विविध शुद्धी प्रक्रिया केल्यानंतरच युरोपमध्ये विशेषत: लंडनमध्ये प्रवेश मिळेल, असे सांगण्यात आले होते. मात्र केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने युरोपने थेट हापूस आंब्याला प्रवेशच नाकारला आहे.
कोकणातील हापूस आंब्याची किमया संपूर्ण जगभर पसरली आहे. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, चीन, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, न्यूझीलंड, ब्राझील यांसह आखाती देशांत हापूसला प्रचंड मागणी आहे. युरोप आणि आखाती देशात निर्यात होताना या फळावर फारशी प्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. पण गेल्या वर्षी हापूस आंब्यात आढळणाऱ्या काही किटकांमुळे युरोपमधील ग्राहक जागरूक झाले आहेत.
त्यामुळे हापूस आंब्यावर उष्ण जल उपचार (हॉट वॉटर ट्रीट्रमेंट) अतिउष्ण तापमान (व्हेपर हीट ट्रीटमेंट) किंवा किरणोत्सर्ग (रेडिएशन) आदी प्रक्रिया केल्याशिवाय युरोपमध्ये पाठवू नका, असे युरोपमधील बाजारपेठांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘कृषी व प्रक्रिया अन्नपदार्थ उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण’ने (अपेडा) देशातील निर्यातदारांना युरोपमध्ये हापूस पाठविण्यास मज्जाव केला आहे.

अपेडाकडून अद्याप कोणतीही सूचना न आल्याने निर्यातदारांची केवळ आखाती देशात निर्यात सुरू आहे. या हंगामात हापूस आंब्याच्या सुमारे दीड लाख पेटय़ा विविध देशांत निर्यात केल्या जात आहेत.
मोहन डोंगरे, निर्यातदार.

हापूस आंब्याला या तीन प्रक्रियेतील कोणती प्रक्रिया सोयीस्कर आहे, हे अन्नपुरवठा मंत्रालयाकडून लवकरच स्पष्ट करण्यात येईल. त्यानंतर निर्यातदारांना ती प्रक्रिया बंधनकारक करण्यात येणार आहे.
– डॉ. सुधांशू,
अपेडाच्या मुंबई पश्चिम विभागाचे प्रादेशिक अधिकारी.

हापूस आंब्यासाठी सांगण्यात आलेल्या या तीन प्रक्रिया खर्चीक असल्याने आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गार पडलेला व्यापारी व बागायतदार आर्थिकदृष्टय़ा अधिक गारठणार आहे.
– संजय पानसरे, संचालक,
फळ बाजार समिती.