Mumbai BJP New President Ameet Satam : आमदार आशिष शेलार यांचा मुंबई भाजपा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपाने आमदार अमित साटम यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमातून मुंबई भाजपा अध्यक्ष म्हणून अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी फडणवीस, चव्हाण व बावनकुळे यांनी साटम यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. अमित साटम अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४ पासून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागील प्रदीर्घ काळापासून आशिष शेलार यांनी भाजपाच्या मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं आहे. २०१७ ची महानगरपालिका निवडणूक, त्यानंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय उत्तमपणे काम केलं आहे. मध्यंतरी ते मंत्री असताना मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई भाजपाचं अध्यक्षपद सांभाळलं. त्यानंतर पुन्हा एकदा आशिष शेलार यंच्याकडे मुंबईची धुरा सोपवण्यात आली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
फडणवीस म्हणाले, “आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मंबई भाजपाला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. या निवडणुकीद्वारे भाजपा पुन्हा एकदा मुंबईत पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचं सिद्ध केलं. आता पक्षाच्या नवीन संघटनात्मक रचनेत आशिष शेलार हे मंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपाने मुंबईसाठी नवीन अध्यक्ष निवडला आहे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष (भाजपा प्रदेशाध्यक्ष) रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतील सर्व सदस्यांशी व वरिष्ठांशी चर्चा करून अमित साटम यांची या पदासाठी निवड केली आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “अमित साटम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. याआधी त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून देखील काम केलं आहे. भाजपात त्यांचा प्रदीर्घ असा कार्यकाळ राहिला आहे. विधानसभेत एक अभ्यासू व आक्रमक असे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी जी कल्पकता हवी ती देखील साटम यांच्याकडे आहे. मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळात त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी मुंबईत आपली घोडदौड कायम राखेल. पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे. त्यासाठी सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या प्रकारे पार पाडतील.”