‘मातोश्री’वर आज महत्त्वाची बैठक
शिवसेनेने ‘वर्तन’ न सुधारल्यास योग्य तो निर्णय घेण्यास भाजप मोकळा आहे, असा इशारा भाजप अध्यक्ष अमित शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज, रविवारी अमित शहा ठाकरे यांना ‘मातोश्री’वर भेटणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी उपस्थित असतील.
सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेने सातत्याने भाजपची अडवणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांना वेळोवेळी शिवसेनेकडून लक्ष्य करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य सरकारवरही सेनेने अनेकदा टीकेची झोड उठवली आहे. गेली दोन वर्षे भाजपने ते सहन केले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दय़ावरून ठाकरे यांच्यासह सेनानेत्यांनी मुख्यमंत्री व भाजप यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. सत्तेत राहून पदे उपभोगायची आणि विरोधी पक्षांपेक्षाही अधिक आक्रमकपणे भाजपची अडचण करायची, ही दुटप्पी भूमिका भाजप यापुढे कदापिही सहन करणार नाही. सत्तेची फळे चाखायची असतील, तर शांत रहावे अन्यथा विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असा निर्वाणीचा इशारा शहा यांच्याकडून आजच्या भेटीत शिवसेनेला दिला जाणार असल्याचे भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांकडून समजते.
शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीमागे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे कारण दिले जात असले तरी भाजपने अजून उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे या भेटीत यापुढे शिवसेनेचे ‘वर्तन’ खपवून घेतले जाणार नाही, अन्यथा योग्य निर्णय घेण्यास भाजप मोकळा आहे, असा इशारा दिला जाणार आहे. शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढले किंवा शिवसेना स्वतहून बाहेर पडली, तरी शिवसेनेसह विरोधी पक्षांमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सरकार टिकविण्यासाठी भाजपपुढे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे शिवसेनेला अंतिम इशारा देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले. भेटीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित राहतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कक्षात शहा, ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.