लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : बोगस कॉल्स, संदेश, ई-मेल्समुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई पोलीस २०२३ पासून विशेष लक्ष देत आहेत. वर्षभरात २४.५ करोड रुपये फसवणूक झालेल्या नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्यात मुंबई पोलिसांद्वारे जमा करण्यात आले आहेत, अशी महिती मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई टेक विकमध्ये दिली.
टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे मुंबई टेक विक या स्टार्ट-अप महोत्सव १८ ते २३ फेब्रुवारी पर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आणि काही प्रसिध्द कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मुंबई टेक विकमध्ये शादी डॉट कॉम, बूक माय शो, बिल डेक, चलो, हंगामा यांसारख्या ४५ कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच या मुंबई टेक विकमध्ये सहभगी होणाऱ्या तरुणांना टेक्नॉलॉजी बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पहिल्या दिवशी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, फिल्म साथीचे संस्थापक अनुपमा चोप्रा आणि गूगल इंडियाचे उपाध्यक्ष संजय गुप्ता उपस्थित होते.
आणखी वाचा-फ्लेमिंगोच्या मृत्यूनंतर नवी मुंबईतील दिशादर्शक फलक हटविला
प्रादेशिक भाषांतील उद्योजकांना प्राधान्य द्यावे – स्मृती इराणी
नविन स्टार्टअपमध्ये प्रादेशिक भाषेचा पर्याय उपलब्ध केला तर देशातील अनेक लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. भाषा ही लोकांना जोडण्याचे काम करते त्यामुळे स्टार्ट अप सुरू करताना भारतातील प्रादेशिक भाषांना प्रत्येक उद्योजकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबई टेक विकच्या ऑनलाईन सत्रात व्यक्त केले. भारताला २०३० पर्यंत १० ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ३५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य साध्य करायचे असेल तरुण उद्योजकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरच देश महासत्ता म्हणून जगासमोर येईल, असे मत भारताचे जी -२० शेर्पा अमिताभ कांत यांनी या महोत्सवात व्यक्त केले.