मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन वानखेडे यांना एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबित केले आहे. याबरोबरच विभागीय चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे आगार व्यवस्थापक वानखेडे हे दिवसभर कर्तव्यावर उपस्थित न राहता मद्यप्राशन करून शासकीय निवासस्थानी असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आगारातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरून कळवली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने तेथे छापा टाकला असता तक्रारीमध्ये तथ्य आढळले. एसटीच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक वानखेडे यांची अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांच्या विरोधात परतवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ८५(१) अन्वये गुन्हा दाखल केला.

सुरक्षा व दक्षता विभागाने केलेल्या तपासणीमध्ये संबंधित आगार व्यवस्थापक दिवसभर मद्यप्राशन करून आगारात उपस्थित न राहता बाहेर फिरत होते. त्यामुळे आगारातील दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली. त्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक मार्गांवरील बस रद्द झाल्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. यासह शासकीय निवासस्थानी व आगारात मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याबद्दल जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाली, असा निष्कर्ष काढून त्यांच्यावर रितसर गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात लवकरच प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली त्यांची खातेनिहाय विभागीय चौकशी करण्यात येणार असून त्यात दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्याने दिली.