मुंबई: जुन्या निवृत्तिवेतन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे अत्यावश्यक सेवेत अडथळे निर्माण होऊन सामान्य नागरिकांचे हाल होऊ शकतात. त्यामुळे या आंदोलनावर सरकारने तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत काही तोडगा निघाला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी संपावर जाणे पसंत केले. त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी अत्यावश्यक सेवा बंद आहेत. त्याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे पवार म्हणाले. कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार तातडीचे प्रयत्न करीत असले तरी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासंदर्भात सरकारची काय भूमिका आहे, याबाबत सरकारने निवेदन करावे, असे देखील पवार यावेळी म्हणाले.