‘प्रकट मुलाखत’ कार्यक्रमातील गद्य संवादाबरोबरच शुक्रवारी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात उपस्थित असलेल्या श्रोत्यांना संगीत मैफलीचा आनंद मिळाला. पॉप्युलर प्रकाशनाचे सर्वेसर्वा रामदास भटकळ यांनी बालकवी यांची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता रागदारीत गाऊन संपूर्ण मुलाखतीवर अक्षरश: कळस चढविला आणि रसिक श्रोतेही भटकळ यांच्या आवाजातील रागदारीतील ती कविता मनात गुणगुणतच मार्गस्थ झाले..
निमित्त होते व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, वैद्य साने ट्रस्ट आणि ग्रंथाली यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कृतार्थ मुलाखत माला’ कार्यक्रमाचे. ज्येष्ठ नाटककार-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी भटकळ यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीमधून भटकळ यांचा प्रकाशक, शास्त्रीय गायक, लेखक, कुटंबप्रमुख, लेखकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, साने गुरुजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र, भटकळ यांचे सामाजिक काम असा विविधांगी प्रवास उलगडला .
मुलाखतीची सांगता एखाद्या गाण्याने करावी, अशी विनंती मतकरी यांनी भटकळ यांना केली तेव्हा त्याचा मान राखत भटकळ यांनी बालकवी यांची ‘आनंदी आनंद गडे’ ही कविता रागदारीत सादर केली. त्यांनी सांगितले, या पूर्वी ही कविता गाण्याच्या माध्यमातून लोकप्रिय असून मी कवितेला रागदारीत बसविले आहे. ही चाल माझीच आहे. आणि त्यानंतर भटकळ यांनी कसलेल्या गायकाप्रमाणे सादर केलेल्या ‘आनंदी आनंद गडे’ला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
गप्पांच्या ओघात मतकरी यांनी या विषयी विचारलेल्या प्रश्नावर भटकळ म्हणाले की, पं. एस.सी. आर. भट यांच्याकडे काही वर्षे शास्त्रीय संगीताची तालिम घेतली. काही वर्षांपूर्वी शास्त्रीय संगीताच्या मैफलीही केल्या. पण पुढे प्रकाशन व्यवसायाच्या व्यापामुळे तिकडे फारसे लक्ष देता आले नाही. गायक व संगीतकार पं. यशवंत देव यांच्याकडे मी भावगीतेही शिकलो.
पुस्तक प्रकाशन हा पोटापाण्याचा व्यवसाय असला तरी मी त्याचा विद्यापीठासारखा उपयोग करून घेतला. फक्त मला आवडेल ते नव्हे तर सर्वसामान्य वाचकांनाही काय आवडेल, त्याचा विचार करून प्रकाशनासाठी पुस्तकांची निवड केल्याचे भटकळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. जे करायचे होते ते करू शकलो नाही पण तडजोड म्हणून कोणतीही गोष्ट केली नाही, याचे समाधान खूप मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.