मुंबई : पर्यटकांचा प्रतिसाद वाढताच बेस्ट उपक्रमाने पुरातन वारसा वास्तू सफर बस सेवा १७ मार्चपासून मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय  घेतला. त्यानंतर या सेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये ३४५ पर्यटकांनी सफरीचा आनंद लुटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईमध्ये ३ नोव्हेंबर २०२१ पासून पर्यटकांसाठी खुल्या दुमजली बसतून पर्यटन सेवा सुरू करण्यात आली. गेट वे ऑफ इंडिया येथून शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६.३० आणि रात्री ८ वाजता दोन बस फेऱ्या सोडण्यास सुरुवात झाली. या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून दुपारी ३ आणि सायंकाळी ५ वाजता दोन अतिरिक्त बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. २७ नोव्हेंबर २०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवारी सकाळी ९.३० आणि ११ वाजता दोन अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येऊ लागल्या. मात्र वाढलेल्या उकाडय़ामुळे पर्यटन बसच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१७ मार्चपासून आठवडय़ातील सर्व दिवस सायंकाळी ५ वाजल्यापासून मध्यरात्री उशिरापर्यंत पर्यटन बस सेवा उपलब्ध करण्यात आली. या दिवशी एकूण ७२ पर्यटकांनी बसमधून प्रवास केला. १८ मार्चला रंगपंचमीच्या दिवशी ३५,  १९ मार्चला ४३, २० मार्चला ५० पर्यटकांनी या सफरीचा आनंद लुटल्याची माहिती देण्यात अधिकाऱ्यांनी दिली. २३ मार्चला हीच संख्या ६० होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधान भवन, एन.सी.पी.ए, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, हॉनिर्मल सर्कल, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जुने कस्टम हाऊस ही ठिकाणे पर्यटकांना दाखविण्यात येतात. त्यासाठी दुमजली प्रकारातील बस सेवेत आहे. यात अपर डेकमधून प्रती व्यक्ती प्रवासासाठी १५० रुपये आणि लोअर डेक प्रती व्यक्ती ७५ रुपये शुल्क आकारण्यात येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ancient heritage tours favorite tourist journey of 345 tourists eight days amy
First published on: 25-03-2022 at 01:04 IST