मुंबई : फेसबुकवर ओळख झालेल्या जपानी तरुणीने एका वृध्द व्यापाऱ्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढून ५२ लाख रुपयांना फसवले आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. नंतर मात्र तो सायबर भामट्याने जाळ्यात अडकविण्यासाठी रचलेला मधुजाल (हनी ट्रॅप) असल्याचे उघड झाले.
फिर्यादी ६५ वर्षांचे असून पवई येथे राहतात. जून महिन्यात त्यांना फेसबुकवर सुप्रिता शर्मा नावाच्या तरूणीने मैत्रीची विनंती (फ्रेंडशीप रिक्वेस्ट) केली होती. हॉंगकॉंग येथील आयबीएम कंपनीत उच्चपदावर काम करते असे तिने आपल्या प्रोफाईल मध्ये लिहिले होेते. फिर्यादी यांनी तिची मैत्रीची विनंती स्विकारली होती. त्यानंतर सुप्रिताने मेसेंजर मधून फिर्यादी यांच्याशी संवाद साधायला सुरवात केली.
मोबाईलवर वरून मधाळ बोलणे
सुप्रिताने फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक मागितला आणि त्यांच्याशी बोलणे सुरू केले. आपल्या मधाळ बोलण्यातून तिने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून मैत्री केली. सध्या हॉंककॉंग येथील आयबीएम कंपनीत काम करत असून लवकरत जपान मधील आयबीएम क्रिप्टो ट्रेडींग प्लॅटफॉर्म या कंपनीत व्यवस्थापक पदी रूजू होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार तिने काही दिवसांनी जपानमध्ये गेल्याचे सांगितले. गप्पानंतर तिने फिर्यादी यांना बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीबाबत सांगण्यास सुरवात केली. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास कसा फायदा होईल ते सुप्रिता सांगू लागली. फिर्यादी सुरुवातील तयार नव्हते. मात्र सुप्रिताने आपल्या लाडीक बोलण्याने भुरळ घालून त्यांना गुंतवणूकीसाठी तयार केले.
दिड महिन्यात ५२ लाख रुपये भरले
फिर्यादी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाल्यानंतर त्यांना एक लिंक पाठविण्यात आली. त्यावर लॉगीन करून पासवर्ड आणि आयडी तयार करण्यात आला. त्यावर फिर्यादी पैसे भरत गेले. १७ जुलै पर्यंत त्यांनी ५२ लाख रुपये भरले होते. त्यावर त्यांना भारतीय चलनात १ कोटी ३ लाख १७ हजार रुपयांचा नफा दिसत होता. दरम्यान, सुप्रिता फिर्यादी यांना फोन करून आणखी पैसे गुंतविण्यासाठी सांगत होती. मात्र आणखी पैसे नसल्याने फिर्यादी यांनी पैसे काढण्यासाठी विचारणा केली. तेव्हा ही रक्कम काढायची असेल तर ३० टक्के कर द्यावा लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली तेव्हा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजले.
पश्चिम सायबर विभागात गुन्हा दाखल या फसवणुकी प्रकरणी फिर्यादी यांनी आधी सायबर हेल्पलाईनच्या १९३० या क्रमांकावर संपर्क करून तक्रार दिली. नंतर या प्रकरणी पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात सुप्रिता शर्मा तसेच अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड) तसेच फसवणुकीप्रकरणी कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) आणि ६१ (२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.