अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला येथील मोक्याच्या ठिकाणचा सुमारे तीन हजार चौरस मीटर आकाराचा भूखंड शेजारील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयाच्या वर्धापनदिन सोहळ्यासाठी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. दोन दिवसांच्या या सोहळ्यासाठी फक्त साडेतीन हजार रुपयेच भाडे आकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा भूखंड ‘शांताबाई केरकर मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्ट’ला वितरित करण्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या पाश्र्वभूमीवर हा भूखंड अन्य कोणासही वापरासाठी देणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे.
या भूखंडाशेजारी कोकिळाबेन अंबानी रुग्णालय आहे. रुग्णालयाचा वर्धापनदिन सोहळा साजरा करता यावा यासाठी हा भूखंड दोन दिवसांसाठी वापरण्यास देण्यात आला आहे. या आशयाचे पत्र १७ जानेवारी २०१४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केले. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’ कडे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे पत्र जारी होण्याच्या एक दिवस आधी भूखंडावर मोठी आग लागली व त्यावर जमलेली झुडपे जळून खाक झाली. त्यामुळे भूखंड मोकळा झाला. वस्तुत हा भूखंड शांताबाई केरकर मेमोरिअल चॅरिटेबल ट्रस्टला वितरित करण्याचे आदेश १९९८ मध्येच देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष ताबा मिळवण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून ट्रस्टचे विश्वस्त डॉ. बळवंत केरकर न्यायालयीन लढा देत आहेत. अखेरीस गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला. या निकालाला आव्हान देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. परंतु डिसेंबपर्यंत आव्हान देण्यात आले नव्हते. अखेरीस १२ डिसेंबर २०१३ रोजी शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी दोन आठवडय़ांची मुदत मागितली. ती संपली तरीही याचिका दाखल झालेली नाही. अशातच हा भूखंड कोणालाही वापरासाठी देणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे डॉ. केरकर यांचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी संजय देशमुख यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांना पाठविलेल्या एसएमएसलाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.