मुंबई: रायगड पालकमंत्री पदावरुन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा वाद सर्वज्ञात आहे. गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावे यासाठी रायगड मध्ये काळीजादू केली जात असल्याच्या काही चित्रफिती प्रसारित झालेल्या आहेत. गोगावले यांचे नाव न घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य ॲड अनिल परब यांनी मला माझ्या बहिणीचे काळ्या जादू पासून संरक्षण करायचे आहे म्हणत सभागृहात लिंबू व मिर्चीचे प्रर्दशन केले.
राज्यातील दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्रयातील पालकमंत्री पद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावले यांनी दावा केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या व राज्याच्या महिला विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून घोषणा झाली होती. या पदाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दावोस येथे असताना स्थगिती द्यावी लागली होती. तेव्हापासून हे पद मिळावे यासाठी गोगावले देव पाण्यात टाकून बसले आहेत.
रायगड मध्ये काळी जादू केली जात असल्याचे समाजमाध्यमावर काही चित्रफिती प्रसारीत झालेल्या आहेत. तो धागा पकडून परब यांनी आमच्या लाडकी बहीण तटकरे यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटते. त्यांचे काळ्या जादू पासून संरक्षण व्हावे यासाठी लिंबू मिर्ची देत असल्याचे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.