मुंबई : अन्याय्य परिस्थितीविरोधात लढू पाहणाऱ्या जगभरातील समुदायाची स्पंदने टिपणारे आणि त्याला साहित्यातून वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे रशियाशी घट्ट नाते आहे. दोन वर्षांपूर्वी अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले, त्याचे औचित्य साधून मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात १४ सप्टेंबरला त्यांच्या तैलचित्राचे समारंभपूर्वक अनावरण करण्यात येणार आहे.

 अण्णा भाऊंनी रशियाविषयी लिखाण केले आहे. त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ लोकप्रिय आहे. याशिवाय, त्यांच्या अनेक कथा – कादंबऱ्या रशियन भाषेत भाषांतरित करण्यात आल्या आहेत. आपल्या साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी रशियन जनतेच्या मनातही आदराचे स्थान मिळवले आहे. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले सीमोल्लंघन लक्षात घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने रशियात मॉस्को येथील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेच्या प्रांगणात अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळय़ाचे १४ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या या पुतळय़ाचे अनावरण आणि मॉस्कोतील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार असल्याचे ‘मिलेनियम चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’चे सुनील वारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या समारंभाला केंद्रीय राज्यमंत्री नारायण स्वामी उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे असतील.

भारत – रशिया राजनैतिक संबंध स्थापनेलाही ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने १४ आणि १५ सप्टेंबरला याच विषयावर मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, असे विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ ओरिएंटल स्टडीज’, ‘रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस’, ‘स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट पिटर्सबर्ग’ आणि ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररी’ यांचा या परिषदेत सहभाग असून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि मुंबई विद्यापीठाने या परिषदेच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यानिमित्ताने ५० वर्षांपूर्वी रशियन भाषेत भाषांतरित, प्रकाशित झालेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींचे ‘मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून पुन:प्रकाशन करण्यात येणार असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.