अण्णासाहेब मिसाळ नवी मुंबई पालिका आयुक्त; सचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे सचिव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असून मंगळवारी पहिल्या टप्यात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अशा २६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तपदी शिवाजी दौंड यांची, तर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन कुर्वे यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.

प्रशासनातील बदलाची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून मंत्रालयात सुरू होती. विधिमंडळ अधिवेशन संपताच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी बदल्याचे आदेश देताना पुन्हा एकदा विश्वासू अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी नियुक्त केल्याचे बोलले जात आहे.

कामगार आयुक्त राजीव जाधव यांची काही महिन्यांतच बदली करताना त्यांना मत्स्यआयुक्तपदी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांची बदली करण्यात आली आहे. डी. एस. खुशवाह यांची महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर त्यांच्या जागी म्हाडा दुरुस्ती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. राधाकृष्णन यांची बदली करण्यात आली आहे. सिडकोत सहव्यवस्थापकीय संचालकपदी प्रशांत नारनवरे यांची, तर भंडारा जिल्हाधिकारीपदी डॉ. नरेश गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारीपदी मिलिंद बोरीकर, राजेंद्र भारूड यांची नंदुरबार जिल्हाधिकारीपदी, के.बी. शिंदे यांची पालघर जिल्हाधिकारीपदी, अजित कुंभार यांची पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारीपदी यू.ए. जाधव यांची सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एस.एम. भागवत, पी.टी. वायचळ यांची सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Annasaheb misal municipal commissioner of navi mumbai abn
First published on: 17-07-2019 at 01:32 IST