अनामत रक्कमेस मुकावे लागणार

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून या घरांच्या सोडतीसाठी बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री, स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. मात्र ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील घरांसाठी इच्छुक असलेल्यांना अंत्यत विचारपूर्वक अर्ज भरावा लागणार आहे. या योजनेतील विजेत्यांनी घर नाकारल्यास, घर परत केल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. अशा विजेत्यांच्या संपूर्ण अनामत रक्कमेचा परतावा न करण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. तशी विशेष सूचना सोडतीच्या जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> होळीच्या रंगाचा बेरंग! पाण्याचा फुगा डोक्यात लागल्याने मुंबईत ४१ वर्षीय तरूणाचा मृत्यू

कोकण मंडळाच्या सोडतीत मुंबई महानगर प्रदेशातील घरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह एमएमआरमधील इच्छुकांना घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक वर्षांनंतर या सोडतीसाठी ‘प्रथम प्राधान्य’ योजना लागू करण्यात आली आहे. यात विरार – बोळीजमधील २,०४८ घरांचा समावेश करण्यात आला आहे. ही घरे अनेक वेळा सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र त्यांची विक्री झाली नाही. या घरांची विक्री व्हावी यासाठी ती ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेतील घर कोणालाही घेता येते, त्यासाठी अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या घरांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा >>> भाजपविरोधात एकजुटीची काँग्रेसची भूमिका, मोदी सरकारवर पटोले यांची टीका

‘प्रथम प्राधान्य’ योजनेत विजयी ठरणाऱ्यांनी घर नाकारल्यास त्यांना अनामत रक्कम परत मिळणार नाही. ‘प्रथम प्राधान्य’मध्ये अल्प आणि मध्यम गटातील घरे असून अल्पसाठी ५० हजार रुपये तर मध्यमसाठी ७५ हजार रुपये अशी अनामत रक्कम आहे. त्यामुळे संबंधित विजेत्यांना ५० आणि ७५ हजार रुपयांवर  पाणी सोडावे लागणार आहे. इतर म्हाडा गृहनिर्माण, २० टक्के आणि पीएमएवायमधील घरांसाठीच्या सोडतीमधील विजेत्यांनी घरे नाकारल्यास त्यांची केवळ एक टक्के अनामत रक्कम कपण्यात येणार आहे. मात्र प्रथम प्राधान्य योजनेतील घर नाकारणाऱ्याची संपूर्ण अनामत रक्कम संबंधित विजेत्याला परत न देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसे सोडतीच्या जाहिरातीत विशेष सूचना म्हणून स्पष्टपणे नमूद कारण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Applications acceptance for 4654 houses of konkan mandal of mhada started from march 8 mumbai print news zws
First published on: 08-03-2023 at 11:16 IST