मुंबई : police recruitment students पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही बारावी उत्तीर्ण असताना राज्यभरात तब्बल साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर, बीटेक, एमकॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनीही आणि ६८ तृतीयपंथीयांनीही अर्ज केले आहेत.

राज्य पोलीस दलातील १८ हजार ३३१ पदांसाठी सुमारे १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस दलासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. पण तब्बल सहा लाख ३९ हजार ३१७ पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात कला व वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. याशिवाय विज्ञान शाखेतून पदवी संपादन केलेल्या तरुणांनीही अर्ज केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांनीही या भरतीसाठी अर्ज केले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.

दरवर्षी ५५ टक्के अर्ज पदवीधर अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे असतात. पण या वर्षी हे प्रमाण कमी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य पोलिसांनीही संबंधित बदल संकेतस्थळावर केले असून त्यानंतर तृतीयपंथीयांनाही अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ६८ तृतीयपंथीयांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. मुंबईतही ७ हजार ७६ पदांसाठी भरती होत असून यासाठी सुमारे सहा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्या आयुक्तालयांमुळे पदसंख्या अधिक

दरवर्षी राज्यात सुमारे सहा हजार पदांसाठी भरती होते. पण करोनामुळे दोन वर्षांनंतर भरती होत आहे. तसेच मीरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये सुरू झाल्याने या वर्षी १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.