मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ॲप्रन घालत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना नेमका डॉक्टर कोण आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याचे प्रकार होतात. या घटना रोखण्यासाठी, तसेच डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्यातील फरक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात यावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांना पांढऱ्या रंगाचा ॲप्रन घालणे बंधनकारक असल्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिले. तसेच एखाद्या डॉक्टरने ॲप्रन परिधान केला नाही किंवा योग्यरित्या परिधान न केल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम मौखिक समज देण्यात येईल, त्यानंतर लेखी स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.

राज्यातील आरोग्य विज्ञान महाविद्यालयांमधील अधिष्ठाता, शिक्षक, पदवी पूर्व, पदव्युत्तर, आंतरवासिता विद्यार्थी, निवासी डॉक्टर व इतर सर्व डॉक्टर हे महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात ॲप्रन परिधान करणे बंधनकारक आहे. असे असतानाही बहुतांश डॉक्टर नियम धाब्यावर बसवतात. राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथीची एकूण ४२ वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यामध्ये २ हजार ५६४ अध्यापक, तर ७ हजार ७८७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र यापैकी कोणीही कर्तव्यावर असताना ॲप्रन घालत नाहीत. त्यामुळे डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचारी यांच्यातील फरक स्पष्ट होत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा गोंधळ उडतो. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी याची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता, शिक्षक, पदवी पूर्व, पदव्युत्तर, आंतरवासिता विद्यार्थी, निवासी डॉक्टरांना महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात ॲप्रन परिधान करण्याबाबतचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने डॉक्टरांनी ॲप्रन परिधान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक, अध्यापक वर्ग, विद्यार्थी यांनी अध्यापन वर्गात, प्रात्याक्षिकांदरम्यान, तसेच रुग्णालयामध्ये रुग्ण सेवा बजावताना ॲप्रन परिधान करणे ही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी नियमित ॲप्रन परिधान करताना तो पांढरा शुभ्र, स्वच्छ, निटनेटका असावा, तसेच त्याची सर्व बटन्स लावणे आवश्यक आहे. तसेच ॲप्रन सक्तीचे असल्याचे परिपत्रक काढून डॉक्टरांमध्ये जागरुकता करावी. त्याचप्रमााणे ॲप्रन हा व्यवस्थितरित्या परिधान केलेला असावा, तो निव्वळ हातात असणे, खांद्यावर ठेवणे, बॅगला लावलेला असू नये. कोणत्याही शिक्षक, विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरने ॲप्रन परिधान केला नसल्यास किंवा ॲप्रन योग्यरित्या परिधान न केल्याचे निदर्शनास आल्यास एक वेळ मौखिक समज देण्यात यावी व दुसऱ्या वेळी लेखी स्पष्टीकरण घेण्यात यावे, या मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील परिपत्रक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी जारी केले आहे.