मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. त्यानंतर, मोरे याच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी निर्णय देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरे याने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांच्यासमोर मोरे याच्या जामीन अर्जावर शनिवारी युक्तिवाद झाला. त्यावेळी, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मोरे याच्या अर्जावरील निर्णय १० जानेवारीपर्यंत राखून ठेवला.

हेही वाचा…एसटी महामंडळातील सर्व प्रकल्पांची चौकशी करावी, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

तत्पूर्वी, न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओच्या अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला.

हेही वाचा…मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासाठी सूचना पाठविण्याचे नागरिकांना आवाहन; प्रशासक राजवटीतील तिसरा आयुक्त भूषण गगराणी यांचा पहिलाच अर्थसंकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून जामीन मंजूर करण्याची मागणी मोरे याच्यातर्फे करण्यात आली.