मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला एमएमआरडीएकडून वेग देण्यात आला आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण आठ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता येत्या काही महिन्यातच प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे.
भुयारीकरणाच्या कामासाठी चार टनेल बोरिंग मशीनपैकी दोन टीबीएम तयार झाली आहेत. तयार दोन टीबीएमपैकी एक नायक टीबीएम १६० भागात मुंबईत आणले जात असून आतापर्यंत त्याचे ९५ भाग मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरे अर्जुना टीबीएम चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीतून लवकरच मुंबईत १६० भागात टप्प्याटप्प्यात आणले जाणार आहे. दोन्ही टीबीएमचे सर्व भाग मुंबईत दाखल झाल्यास ते जोडून आॅक्टोबरपासून ठाण्यातील लाॅन्चिंग शाफ्ट येथून हे दोन्ही टीबीएम भूगर्भात सोडून भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
ठाणे ते बोरिवली १२ मिनिटांत
ठाणे ते बोरिवली अंतर एक ते दीड तासांऐवजी केवळ १२ मिनिटांत पार करता यावे आणि ठाणे, बोरीवलीतील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी एमएमआरडीएने ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ११.८ किमी लांबीच्या १८ हजार कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. भुमिपूजनानंतर एमएमआरडीएकडून कामास सुरुवात करण्यात आली असून ठाणे येथे लाॅन्चिंग शाफ्ट तयार करण्याचे काम वेगात सुरु आहे. बोरिवली लाॅन्चिंग शाफ्ट तयार करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टसाठीच्या जागेवरी काही झोपड्या होत्या. त्या झोपड्या हटविण्यात अडचणी येत असल्याने बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टच्या कामास विलंब झाला आहे. मात्र आता एमएमआरडीएने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मदतीने झोपड्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे. झोपड्या हटवून लवकरच बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
लाॅन्चिंग शाफ्टची कामे पूर्ण केल्यानंतर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या अशा भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार भुयारीकरणासाठी एकूण चार टीबीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी स्वदेशी बनावटीचे टीबीएम या प्रकल्पात वापरले जाणार आहे. चेन्नईतील हेरेनकनेट कंपनीला चार टीबीएम तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. टीबीएम पर्यवारणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. त्यामुळे येथील पर्यावरणाला आणि वन्यजीवांच्या, वन्यप्राण्यांच्या अधिवासाला कोणताही धक्का पोहचू नये यादृष्टीने विशेष लक्ष देण्याच्यादृष्टीने अत्याधुनिक असे टीबीएम तयार करण्यात येत आहे.
झाडाच्या नावावरुन अर्जुना नाव
चार टीबीएमपैकी दोन टीबीएम तयार झाल्याची माहिती एमएमआरडीतील सूत्रांनी दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नायक फुलपाखराच्या नावावरुन पहिल्या टाबीएमला नायक नाव देण्यात आले आहे. तर उद्यानातील एका विशिष्ट झाडाच्या नावावरुन दुसऱया टीबीएमला अर्जुना हे नाव देण्यात आलेले आहे. हे टीबीएम यंत्र १६० भागांमध्ये मुंबईत आणले जाणार आहे. त्यानुसार नायक टीबीएम आणण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत १६० पैकी ९५ भाग चेन्नईतून मुंबईत दाखल झाले आहे. आॅगस्टपर्यंत सर्व भाग मुंबईत दाखल होतील. तर अर्जुनाचे भाग आणण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. ही यंत्रे मुंबईत पूर्ण दाखल झाल्यास त्यांची जोडणी करत आॅक्टोबरपासून हे यंत्र भुगर्भात सोडत भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
ठाण्यातील लाॅन्चिंग शाफ्टमधून बोरिवलीच्या दिशेने भुयारीकरणास सुरुवात होणार आहे. पण बोरिवलीतील लाॅन्चिंग शाफ्टमधून ठाण्याच्या दिशेने भुयारीकरणास सुरुवात होण्यास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण यासाठीचे टीबीएम तयार होणे बाकी असून बोरिवली लाॅन्चिंग शाफ्टच्या कामालाही सुरुवात होणे शिल्लक आहे. असे असले तरी बोरिवली लान्चिंग शाफ्टच्या कामालाही वेग देत शक्य तितक्या लवकर येथूनही भुयारीकरणास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. दरम्यान आतापर्यंत प्रकल्पाचे ८ टक्के काम पूर्ण झाले असून हा प्रकल्प पूर्ण होऊन ठाणे ते बोरिवली अंतर १२ मिनिटांत पार करण्यासाठी प्रवाशांना २०२९-३० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.