लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ( एमएमआरडीए) इमारतीत बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणाऱ्या टॅक्सी चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात धमकावणे व खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिमेश मायाराम यादव (३०) असे अटक आरोपीचे नाव असून तो धारावी येथील रहिवासी आहे. आरोपी चालक असून टॅक्सी व इतर वाहने चालवून आपला उदरनिर्वाह करतो. आरोपीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एमएमआरडीएच्या नवीन इमारतीत बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली होती. त्यामुळे कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले होते. सर्व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. याबाबत पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. अखेर यादवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रसिद्धीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. अखेर बीकेसी पोलिसांनी सुरक्षा पर्यवेक्षक प्रशांत प्रभाकर यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री आरोपीला अटक केली. आरोपी टॅक्सी चालकाने इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना खोटी माहिती दिली होती. त्यानंतर त्याला जाब विचारला असता त्याने आपण खोटे सांगितल्याचे कबुल केले, असे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा-उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा धक्का; स्थानिक विकास निधीच्या वाटपात भेदभाव नसल्याचा निर्वाळा
मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांमध्ये ८० हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करुन दिले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेने ११० वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली होती. अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवर विनाकारण ताण येतो.