उलाढाल बंद झाल्याने उपजीविकेचा प्रश्न

नमिता धुरी, लोकसत्ता

मुंबई : टाळेबंदीच्या सुरुवातीला गोरगरीब मजुरांनी जिवाच्या आकांताने केलेले स्थलांतर पाहून महाराष्ट्र हळहळला; मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात रंगांची उधळण करणाऱ्या कलाकारांचे नि:शब्दपणे झालेले स्थलांतर अद्याप दुर्लक्षितच आहे. कलाप्रदर्शने, कलाकृतींची विक्री, इत्यादी कलाविश्वातील उलाढाल बंद झाल्याने काही कलाकारांनी आपली अनेक वर्षांची कर्मभूमी सोडून स्थलांतर केले आहे.

चित्रकार उमेश पाटील यांचे शिकवणी वर्ग टाळेबंदीमुळे बंद झाले. ठाण्यात नव्याने घेतलेल्या घराच्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले. गेल्या वर्षी मे २०२० मध्ये होणारे कलाप्रदर्शन अद्याप झालेले नाही. त्यामुळे घर भाडय़ाने देऊन उमेश यांनी नाशिक येथील सासर गाठले आहे. तेथे पत्नीला छोटासा उद्योग सुरू करून देण्याची कल्पनाही सत्यात उतरलेली नाही. अमरावतीचे एक कलाकार बेंगळूरुच्या महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक  म्हणून काम करण्यासह प्रदर्शनांमध्येही सहभागी व्हायचे. नोकरी गेली आणि वडील वारल्याने कौटुंबिक जबाबदारी वाढली. बेंगळूरुमध्ये भाडय़ाने राहाणे कठीण झाल्याने त्यांनी नाशिकच्या वास्तुस्थापत्यशास्त्र महाविद्यालयात पूर्णवेळ नोकरी पत्करली.  टाळेबंदीच्या सुरुवातीलाच झालेल्या ‘ललित कला अकादमी’च्या प्रदर्शनात आणि नुकत्याच झालेल्या ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या ऑनलाइन प्रदर्शनात प्रशांत अनसाने सहभागी झाले होते. दोन्ही ठिकाणी कलाकृतींची विक्री झाली नाही. प्रशांत यांचे शिकवणी वर्ग बंद पडले. घराचे भाडे देणे कठीण झाले. त्यामुळे गेली १४ वर्षे त्यांना जगवणारी मुंबई सोडून नागपूरला गावी जावे लागले. टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रशांत यांनी पुन्हा मुंबईत येऊन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला असता अपयश आल्यान नागपूरला परतावे लागले.

गेली २० वर्षे चित्रकार म्हणून काम करणारे राहुल वजाळे यांची चित्रप्रदर्शने मुंबईतील नामांकित कलादालनांमध्ये भरत. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या प्रदर्शनात त्यांनी एकदा सुवर्णपदकही मिळवले आहे. टाळेबंदीमुळे राहुल सोलापूरच्या आपल्या गावी शेती करत आहेत. ऐंशी हजार रुपये खर्च करून कोबीची लागवड केली; मात्र हा व्यवसायही तोटय़ात गेला. खारघरच्या घरात लाखमोलाची चित्रे ठेवलेली असल्याने तेथील भाडेही भरावेच लागत आहे.

प्रतिकूल वातावरण

कला महाविद्यालये, नामांकित कलादालने यांमुळे मुंबईतील वातावरण कलेसाठी पोषक आहे. दिग्गज कलाकार, कलाविषयक जाणकार, कलारसिक ग्राहक यांची वर्दळ मुंबईतच अधिक असल्याने अनेक कलाकार जवळपास घर घेऊन मुंबईत व्यवसाय करतात. सध्या कलाकार ज्या जिल्ह्य़ांमध्ये स्थलांतरित झाले आहेत तेथील स्थानिकांमध्ये कलाविषयक जाणीव नाही. सर्वसाधारण चित्रे काही प्रमाणात पाहिली जात असली तरीही ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेण्टिंग’ करणाऱ्यांना तेथे मुळीच वाव नाही. कलाकृती साकारण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक स्थिरता कलाकारांकडे सध्या नाही.